इशान किशनला इंग्लंड दौर्‍यावर मिळणार संधी   

मुंबई :आयपीएल स्पर्धेनंतर भारतीय संघ इंग्लंड दौर्‍यावर जाणार आहे. एका बाजूला आयपीएल स्पर्धा पार पाडण्याची तयारी सुरु असताना दुसर्‍या बाजूला बीसीसीआय निवड समितीने इंग्लंड दौर्‍यासाठी संघ बांधणीचा विचारही सुरु केला. या दौर्‍यात बर्‍याच दिवसांपासून संघाबाहेर असलेल्या इशान किशनला संधी मिळणार असल्याचे समोर येत आहे.
 
अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील बीसीसीआय निवड समितीने इंग्लंड दौर्‍यासाठी खास आराखडा आखल्याचे समजते. भारतीय ’अ’ संघात त्याची वर्णी लागण्याची शक्यता आहे. भारत ’अ’ संघ या दौर्‍यात इंग्लंड लायन्स विरुद्ध २ अनौपचारिक कसोटी सामने खेळणार आहे. या दोन सामन्यातील पहिला सामना ३० मे रोजी नियोजित आहे. ईशान किशन आधी इंग्लंड दौर्‍यातील प्लॅनिंगचा भाग नव्हता. पण आयपीएलमधील दोन खेळाडूंच्या दुखापतीमुळे त्याच्यासाठी संधी निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.
 
आयपीएलच्या यंदाच्या हंगामात आरसीबी संघाचे नेतृत्व करताना दिसलेला रजत पाटीदार आणि याच संघातील देवदत्त पडिक्कल दुखापतग्रस्त आहेत. त्यामुळेच इशान किशनला भारत ’अ’ संघासोबत इंग्लंडची फ्लाइट पकडण्याची एक संधी निर्माण झाली. इंग्लंड दौर्‍यावर रवाना होणार्‍या १४ सदस्यीय भारत ’अ’ संघात आयपीएल प्लेऑफ्सच्या शर्यतीतून बाद झालेल्या संघातील खेळाडूंचा विचार करण्यात आल्याचेही समजते. इशान किशनशिवाय देशांतर्गत क्रिकेटमध्ये खास छाप सोडणार्‍या करून नायरलाही इंग्लंड दौर्‍यावर संधी मिळू शकते. तोही भारतीय ’अ’ संघाकडून खेळताना दिसू शकते. याशिवाय नीतीश कुमार रेड्डी, अभिमन्यू ईश्वरन, ध्रुव जुरेल, शार्दुल ठाकूर, तनुश कोटियान, आकाश दीप, खलील अहमद, अंशुल कंबोज आणि मानव सुथार या खेळाडूंना संघात स्थान मिळू शकते. 

Related Articles